Saturday, April 25, 2015

गोष्ट तशी नेहमीचीच पण दोन क्षण विचार करायला लावणारी. 
एक फुगेवाले काका मला नेहमी दिसायचे सायकलवर फुगे विकताना. पुढे एक छोटा मुलगा आणि मागे एक मुलगी बसलेलीअसायची. खूप प्रेमळ असे हे काका. जास्तीत जास्त फुगे विकले जावे हीच एक तळमळ आणि हेच एक स्वप्न. फुग्यासारख त्याचं आयुष्य म्हटलं तर खूप सुंदर पण क्षणभंगुर. स्वतःच्या पाच मुलांना चांगले संस्कार,चांगल शिक्षण देण्याची तळमळ कायम त्यांच्या डोळ्यात दिसायची. त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टांची,येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव क्षणात विरून जायची. 
दोन मुली ट्रेन मध्ये वस्तू विकायच्या,एक मुलगी घर सांभाळायची आणि बायको दुसऱ्यांच्या घरची काम करायची. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न एकाच आपलं घरं आणि आपलं नातं. जरी ते रक्ताच्या पलीकडचं होत. दोन मुल जरी त्यांची असली तरी तीन मुली मात्र फुटपाथ,कचरा कुन्दिजवळ अशा कठीण परिस्थितीत त्यांना मिललेल्य. 'मुली' असूनही इतक्या कठीण परीस्थितीत कसं सांभाळू हे दडपण त्या दोघांनाही कधीच आलं नाही. कारण नात्यासाठी भरपूर वेळेची,पैशाची,काहीतरी special करण्याची गरज नव्हती . गरज होती फक्त संवादाची आणि एकमेकांबद्दलच्या ओढीची.नातं ही एकच गोष्ट पुरेशी होती त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी. 
मला रोज त्या काकांकडे बघून काहीतरी वेगळं जाणवायचं. एकदा फुगे घ्यायच्या निमित्ताने मी त्यांना विचारलं न समोर आली इतकी सुरेखगोष्ट. त्या काकांनी एकाच वाक्यात मला आयुष्याच सार सांगितलं जे कदाचित अनेक पुस्तकं वाचूनही मला कधी कळलं नसतं ते म्हणाले, 'आयुष्यासाठी मी नाही तर आयुष्य माझ्यासाठी आहे.'

Monday, April 20, 2015

                                                           शाळा 
शाळा एक रोजचीच जागा पण म्हटलं तर एक जग. आणि याच शाळेत एकमेकांना भेटले ते दोघ 
शाळेच्या पहिल्या दिवशी ओळख झाली पण मैत्री आणि प्रेम मात्र  अधुर,अबोल राहिलं. तो करियर ला प्राधान्य देणारा तर ती नाती जपणारी.दोन्ही विरुद्ध टोक पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काहीतरी वाटायचं जे कधीच सांगता आलं नाही. आपापल्या बाकावरून चोरून कटाक्ष टाकला जायचा आणि या निःशब्द भावनेतून खूप सुख मिळायचं.दोघांनाही आपापले,जवळचे खूपजण होते. पण तरीही हक्काचं कोणीतरी हवं होत. 
अनेक दिवस,महिने,वर्ष गेली आणि एक दिवस शाळेच्या निरोपाची वेळ आली.त्या निरोपाबरोबरच त्यांनी एकमेकांचाही निरोप घेतला फक्त नजरेतूनच. एकमेकांचा आनंद,खंत सगळ काही न बोलताच कळत होत.एकमेकांबद्दलच्या भावना उमटल्या खऱ्या पण फक्त कागदावरच.एकमेकांशी एकही शब्द न बोलणारे ते विचारातून, मनातून, कृतीतून कायमचं एकमेकांशी जोडलेले होते. 
शिक्षण संपल, करियर घडलं,लग्न झालं , दोघ आपापल्या मार्गाने गेले पण हे अस्फुट नात मनाच्या तळाशी कायम राहिलं. पण नशीब म्हणतात ते हेच असेल कदाचित. आयुष्याच्या अशा वळणावर दोघ एकमेकांना भेटले जिथे सगळ काही होत नव्हत फक्त आपलं माणूस.
आज कित्येक वर्षानंतरही ते नातं तसच आहे. तीच ओढ, मनाच्या कोपऱ्यात नाही तर स्वतःच्या सर्वस्वात जपून ठेवलेली . हीच मर्मबंधातली ठेव अनुभवण्यासाठी,जपण्यासाठी ते निघालेत एकमेकांच्या साथीने एका वेगळ्या प्रवासाला.

Tuesday, April 14, 2015

प्रारंभ

                                                                     

                      आजपासून माझ्या blog ला  सुरुवात करत्ये. आपल्या संस्कृतीत चांगली काम चांगला मुहूर्त बघून केली जातात. पण खरं तर आपण चांगल काम ज्या क्षणापासून सुरु करू तो चांगला मुहूर्त असतो. आज blog सुरु करण्याचा हा मुहूर्त आहे कारण आयुष्याबद्दलचे फारसे विचार नसलेल्या वयातही रंग-रेषांचा माध्यमातून, साध्या सोप्प्या प्रेमळ वागण्यातून, आणि आपल्या कलेइतक्याच  गोड असलेल्या आपल्या स्वभावातून ज्या सगळ्यांच्या  आपल्याशा झाल्या अशा आमच्या फडके बाईंचा वाढदिवस !

                      मला आठवतंय  लहानपणीच्या माझ्या एका वाढदिवसाला त्या स्वतः केक घेऊन माझ्या घरी आलेल्या तेव्हा त्या आपल्यासाठी काहीतरी करतायत हे कळण्याच वय नव्हत पण प्रेमाने केलेली गोष्ट इतके वर्षानंतर आजही लक्षात आहे. आज कागदावर चित्र म्हणून जे काही थोडं फार काढता येतं ते त्यांचामुळेच.  त्यांचाकडे क्लास ला जायच्या आधी चित्रकलेत २५ पैकी ११ मार्क्स मिळायचे. आपल्या मुलीला जर बर चित्र काढता यावं या एकाच हेतूने आईने मला त्यांचाकडे पाठवलं आणि चित्रकलेत तर मार्क्स मिळालेच पण आणखीही बरचं  काही त्यांनी शिकवलं जे त्यांचा आठवणीतून, विचारातून कायमचा लक्षात रहिल.

                     फक्त शाळा किंवा चित्रकलेचा क्लास इतकाच त्याचं विध्यार्थ्यांशी नातं नव्हतं तर विध्यार्थ्यांचा लहानपणापासूनच सर्वांगीण विकास व्हावा असा त्यांचा नेहमी उद्देश होता. प्रत्येकाची आवड, कल लक्षात घेऊन प्रत्येकाला काहीतरी नव्याने देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. लहान मुलांबरोबर तितकच लहान होऊन त्या वागायच्या, कधी आईच्या, कधी शिक्षिकेच्या तर कधी मैत्रिणीच्या नात्यातून त्या मुलांची connect व्हायच्या आणि म्हणूनच सरस्वतीच्या सगळ्याच विध्यार्थ्यांच्या फडके बाई आवडत्या होत्या आणि नेहमीच असतील.

                    जेव्हा शिक्षक व्हावसं वाटायला लागलं तेव्हा पहिला आदर्श डोळ्यासमोर आला तो बाईंचा. म्हणूनच आज व्यक्त केलेल्या या भावना.  मी चौथीत असताना त्या गेल्या, हे आम्हाला शाळेतच सांगितलं गेलं. आता पोकळी निर्माण झाली इतका उच्च विचार करण्याची क्षमता तेव्हा नसली तरी आपल्या बाईंना गमावल्याची आणि त्या परत कधीच न भेटण्याची खंत आजतागायत मनात कायम राहिली.

                    म्हणूनच आज जी काही छोटीशी सुरुवात करत्ये ती त्यांचा आशीर्वादाने !